कळंब ..दि.२०/०५/२०२०
सोयाबीन पिकातील तण नियंत्रण
सोयाबीनचे चांगले उत्पादन घेण्यासाठी सोयाबीन मधील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील उपाय करावेत
•तण व्यवस्थापन :
सोयाबीन हे पीक खरीप हंगामामध्ये घेतले जाणारे पीक आहे, त्यामुळे शेतामध्ये पीक उभे असताना सोयाबीनच्या रोपांसोबतच आवश्यक नसणारे मागील हंगामातील पिके व तणांची मोठ्या प्रमाणावर उगवण होते व झपाट्याने वाढ होते. सोयाबीनची लागवडीपासून ते पिकाची काढणी होईपर्यंत तण पिकाला घातक असते. पिकामध्ये वाढणारे तण हे सोयाबीनला लागणारे पोषण अन्नद्रव्ये आणि पाणि , जागा, सूर्य प्रकाश इत्यादींसाठी स्पर्धा करते, त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. तणांमुळे सोयाबीन पिकामध्ये किडी व रोगांचे प्रादुर्भाव वाढतो त्यांचे नियंत्रण व मशागतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होऊन तण नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांमुळे उत्पादन खर्च वाढतो.
काढणीच्या वेळी वाढलेल्या तणांमुळे अडथळा निर्माण होतो तसेच त्यांचे बी पिकाच्या बियांसोबत मिसळले जाते त्यामुळे सोयाबीनच्या बियाण्याची गुणवत्ता कमी होते.
सोयाबीन पिकामध्ये येणार्या तणांचे योग्य वेळी नियंत्रण न केल्यास उत्पादनात सरासरी ५३ टक्के पर्यंत घट होते.
सोयाबीनची पेरणी करून यशस्वी उगवण झाल्यानंतर सुरुवातीच्या २०-४५ दिवसांच्या कालावधीमध्ये तणांचे योग्य नियंत्रण फार महत्वाचे असते. सोयाबीन पिकामध्ये- हरळी, लव्हाळा, चिकटा, चिमणचारा, केणा इ. एकदल वर्गीय तर गाजरगवत, एकदांडी, रेशीमकाटा, तांदुळजा, पाथरी, दुधी इ. द्विदल वर्गीय तणे आढळतात.
तण नियंत्रणासाठी उपाय :-
१ खुरपणी किंवा कोळपणी करणे :-
सोयाबीन पीक रोप आवस्थेमध्ये असताना त्याची वाढ सावकाश होत असते या वेळी तणांचा प्रादुर्भाव झाल्यास रोपांची वाढ खुंटते व पीक अपेक्षेप्रमाणे निरोगी व सुदृढ येत नाही. पीक फुलोर्यापर्यंत तणविरहित ठेवणे उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यासाठी पहिली खुरपणी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि दुसरी खुरपणी पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी करावी किंवा पिकातील तण उपटून त्याचे पिकामध्येच आच्छादन करावे. किंवा खुरपणीसाठी मजूरांची कमतरता असल्यास तणांचा प्रादुर्भाव पाहून ४० ते ४५ दिवसांपर्यंत कुळवाच्या दोन पाळ्या कोळप्याच्या सहाय्याने घालाव्यात
२) रासायनिक तणनाशक वापरून:-
मजुरांची उपलब्धता नसल्यास खुरपणी किंवा कोळपणी करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत तण नाशके वापरुन वेळीच तणांचा बंदोबस्त करता येतो. पेरणीपूर्वी, तण उगवण्यापूर्वी व उगवल्यानंतर वापरायची तण नाशके वेगवेगळी असतात. त्यामुळे तण नाशक वापराचे नियोजन पेरणी पूर्वी करणे गरजेचे असते.
अ) पेरणीपूर्वी तण नाशक वापरुन :-
१.फल्युक्लोरॅलीन ४५ ई.सी.(बासालीन)
२.००लीटर/हेक्टरी,१०००लिटर पाण्यात मिसळून ते जमिनीत ओल असतांना फवारुन ते वखराने जमिनीत चांगले मिसळावे व नंतर पेरणी करावी.
आ) बी उगवण्यापूर्वी तण नाशक वापरुन :-
१. पेन्डिमिथॅलीन ३० ई.सी.(स्टॉम्प )
२.५लीटर,१००० पाण्यात मिसळून ते एक हेक्टर क्षेत्रावर पीक उगवून जमिनीवर येण्याचे आत जमिनीवर समप्रमाणात फवारावे.
इ) बी उगवल्यानंतर तण नाशक वापरून :-
१. इमॅझेथ्यापिर १० टक्के एस.एल.(परसुट) १ ली.या तण नाशकाची दिलेली मात्रा ५०० ते ७०० ली./हे पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी तणांना २-४ पाने असताना तणांवर फवारावी.
३) एकात्मिक तण व्यवस्थापन :-
सोयाबीन पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन करण्यासाठी बी उगवण्यापूर्वी वापरवायचे कोणतेही एक तण नाशक फवारावे आणि ३० ते ३५ दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी.
शिफारस केल्याप्रमाणे दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडांमधील अंतर ५ - ७.५ सें.मी.राहील अशी पेरणी करावी त्यामुळे रोपांची संख्या (plant population) योग्य राहील.
पीक उगवण्यापूर्वी किंवा पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीस तण नाशक वापरले तर तण उगवून येत नाही.
३०-३५ दिवसांनी एक कोळपणी केल्यानंतर पिकातील सर्व रिकामी जागा सोयाबीनच्या झाडांनी व्यापली जाते. त्यामुळे नंतर पीकाच्या कालावधीत तणांचा प्रादुर्भाव आपोआप कमी होतो. अशा प्रकारे सोयाबीन पिकातील तण नियंत्रण केल्यास उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होते.
संदीप नवनाथ झाडके
एम.एस्सी कृषी ( कृषी विस्तारशास्त्र)
८६६८३३२७४७

Post a Comment