कळंब .दि.१०/०५/२०२०
टेलिकॉम क्षेत्रातील महिन्याला ५० हजार रुपयांची नोकरी, परंतु काहीतरी वेगळे करण्याची जिद्द उराशी बाळगून शहरातील अकीब नय्युम पटेल या युवकाने टेलिकॉम क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर मल्टि रिचार्ज बॅलन्सचे अॅप्लिकेशन तयार करुन या माध्यमातून स्वतःच्या व्यवसायास सुरूवात केली. पटेल यांचे या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून आठ जिल्ह्य़ांमध्ये व्यवसायाचे जाळे पसरलेले आहे. याच बरोबर कळंब चे काहीतरी देणे लागते हे सामाजिक ध्येय ठेवून हा युवक व्यवसायातुन मिळालेल्या नफ्यातुन सामाजिक क्षेत्रातील कार्यामध्ये सहभाग नोंदवत असुन या कोरोनाच्या काळात अनेकांना मदत करुन सामाजिक दायित्व दाखवून दिले आहे.
आयुष्यात एवढे चढ-उतार आहेत की, ज्यांचा आपण विचार देखील करू शकत नाही. अनेक लहान मोठी अपयश देखील आहेत. मोठी अपयशे तर अशी आहेत की, ज्यांमुळे अनेक सोनेरी स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र अपयशातून बरेच काही शिकता देखील येते.
अपयशाने अनेकांच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केला, अनेकदा जीवनात प्रवेश केला. मात्र संघर्ष आणि कधी न हरण्याची जिद्द मनात ठेऊन यश मिळविले आहे. सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे अपयशाला पराभव स्विकारावा लागतो. चढ-उतार, यश-अपयश, सुख-दुःख या सर्वांनी भरलेले एक युवकाचे स्वकर्तुत्वाने कळंब सारख्या शहरात मध्ये राहून एक नाव तयार केले आहे.
त्यांचे नाव आहे अकीब नय्युम पटेल यांचे वडील हे मुळ गाव लाखा (ता.केज जि. बीड) हे असुन वडील उदरनिर्वाह करण्यासाठी सन १९९० साली कळंब येथे स्थायिक झाले.
अकिब पटेल यांनी शालेय शिक्षण सावित्रीबाई फुले महाविद्यालय कळंब येथे पुर्ण केले व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण पुर्ण केले. बारावी नंतर BSC ( Computer Science ) चे शिक्षण घ्यायचे स्वप्न होते. म्हणुन शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे प्रवेश घेतला.
पटेल यांची घरची परिस्थिती जेमतेम होती. मात्र शिक्षणाची आवड आणि यातुन काही तरी करुन दाखवण्याची जिद्द असल्यामुळे या युवकाने शहरातील प्रदीप पाटील यांच्याकडे ऍड पोस्टिंगचे काम सुरु केले. त्याचे त्याला महिन्याला तीन हजार रुपये मोबदला मिळायचा, दिवसभर कॉलेज करायचे व संध्याकाळी ५ वाजता ते पहाटे 5 वाजेपर्यंत नोकरी करायची. अकिब या युवकाने फक्त आणि फक्त काम आणि आपले शिक्षण याकडे लक्ष केंद्रित केले होते. अशा प्रकारे तीन वर्ष नोकरी करून शिक्षण पुर्ण केले. विशेष म्हणजे ८६ % टक्के घेऊन BSC ( Computer Science) विभागात कॉलेजमध्ये प्रथम आला. त्यावेळी आई वडिलांनी डोळ्यातील आनंद अश्रू पुसत आशिर्वाद दिला.
आपल्या आई वडीलांचे स्वप्न उराशी बाळगून अकीब पटेल यांनी शिक्षण पुर्ण झाल्यानंतर MBA ची तयारी करण्यास सुरुवात केली. मात्र आता पुढील शिक्षणासाठी पैसे कोठून आणणार असा डोंगराएवढा प्रश्न समोर उभा होता. मात्र मित्रांनी अकीब ला मदत करण्याचा निश्चय केला, मित्रांच्या मदतीने शहरात स्वतःचे मोबाईल शॉप सुरु केले.
अकीब हा होतकरू आणि चिकाटीने काम करत होता. याच गुणाच्या जोरावर तो यशाकडे वाटचाल करत होता. वोडाफोन कंपनीचे दत्तात्रय मोरे व हनुमंत खेडेकर हा त्याचा गुण हेरुन त्याला वोडाफोन या कंपनी मध्ये काम करण्याची अॉफर दिली. आणि पटेल यांनी याच संधीचे सोने करुन दाखवण्याची जिद्द मनाशी बांधली त्यावेळी त्याला बारा हजार रुपये महिना मिळु लागला, या कालावधी मध्ये बार्शी, भुम व परंडा या ठिकाणी जिद्दीने काम केले. १५ महिन्यात कामाचा वाढता आलेख पाहून निलय ढेपे व राहुल सुराणा यांनी प्रमोशन केले. यावेळी त्याला २५ हजार रुपये मासिक पगार होती. यामध्ये उस्मानाबाद, कळंब व वाशी या भागाची जबाबदारी देण्यात आली होती.
आता या युवकाच्या स्वप्नाला पंख फुटले होते. आणि त्याने स्वतःच्या कामाच्या हिम्मतीवर भरारी घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे हा युवक ध्येय गाठण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत होते.
वोडाफोन मोबाईल सिम कार्ड च्या कंपनीत बढती (प्रमोशन) झाल्यावर सहा महिन्या नंतर टाटा डोकोमो कडुन बीड जिल्ह्यातील एरिया सेल्स मॅनेजरची ऑफर आली, या करीता 50 हजार रुपये पगार व फिरण्याचे पैसे वेगळे अशी अॉफर आली.
व काम सुरू केले. आता परिस्थिती सुध्दा सुधारली आणि पगार सुध्दा चांगला मिळू लागला होता. मात्र तो यामध्ये समाधानी नव्हता.
अडीच वर्ष टाटा डोकोमो सिम कार्ड कंपनीमध्ये काम करून बीड जिल्ह्याची जबाबदारी सांभाळली त्यानंतर टाटा डोकोमो ही ऐअरटेल सिम कार्ड मध्ये विलीन झाली, टाटा डोकोमो नंतर ऐअरटेल सिम कार्ड मध्ये नोकरी सुरु केली. सहा वर्षे नोकरी केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय असावा कारण नोकरीमध्ये फक्त गरजा पुर्ण होतात आणी व्यवसायात इच्छा पुर्ण होतात. हा विचार मनात घर करून होता. नोकरी करण्यापेक्षा मालक होऊन आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे हा विचार अकीब पटेल यांना झोपु देत नव्हता.
टेलिकॉम क्षेत्रामध्ये अनेक वर्षे काम केल्यामुळे या अनुभवातून काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. कमी गुंतवणूक मध्ये चांगला नफा मिळावा व यातुन अनेकांना फायदा मिळावा हा विचार मनात घोळत होता..
टेलिकॉम क्षेत्रातील अनुभवातून मोबाईल दुकानदारांसाठी रिचार्ज करण्यासाठी सोयीस्कर व कमी गुंतवणूक मध्ये दुकानदारांचा व्यापार व्हावा या हेतूने एक मल्टि रिचार्ज अँप्लिकेशन तयार केले. ज्या मध्ये विविध कंपनीचे मोबाईल रिचार्ज व डीटीएच रिचार्ज करता येतील. असे अॅप्लिकेशन तयार केले.
अकीब यांचे स्वप्न आता भरारी घेत असल्यामुळे ठोस निर्णय घेण्याची वेळ आली होती. आयुष्यातील मोठा निर्णय घेत ५० हजार रुपये पगार असणारी नोकरी सोडली. आणि स्वतःचा व्यवसाय नोव्हेंबर २०१८ ला सुरू केला. आणि आयुष्यातील कलाटणी देणार निर्णय ठरला. ग्रामीण भागातील युवक सुध्दा अॅप्लिकेशन तयार करुन या माध्यमातून यशस्वी होऊ शकतात हे अकीब पटेल यांनी दाखवुन दिले आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये डिलरची नेमणूक करून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस अकीब पटेल यांनी बोलून दाखविला.
नोकरी सोडल्यानंतर व्यवसाय वाढवण्यासाठी डीलर नेमण्यास सुरुवात केली व आज सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड व जालना या जिल्ह्यात १०० पेक्षा जास्त डीलर काम करत आहेत. तसेच लहान मोठे दहा हजार पेक्षा जास्त दुकानदार या अँप्लिकेशनचा वापर करून व्यवसाय करत आहेत.
कोल्हापूर सांगली पूरग्रस्तांसाठी स्व. गणपतराव कथले युवक आघाडी यांच्यासोबत किराणा किट पुरवण्यासाठी सहभाग नोंदवला,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा घेतल्या, शिवजयंती नाचुन नाही तर वाचुन या उपक्रमातुन पुस्तकांचे वाटप केले, तसेच कळंब शहरात प्रथमच मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेतल्या.
कोरोनामुळे या गोरगरिब कुटुंबावर उपास मारीची वेळ आली अशा लोकांना मदत करण्यासाठी आगाज फाउंडेशन व आझाद ग्रुप यांनी सुरु केलेल्या उपक्रमात पुढाकार घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचवावी या साठी स्वतहाच्या आर्थिक मदती सोबत इतरांकडून मदत गोळा करुन गरजुवंत गोरगरिबांना किराणा साहित्य किट चे वाटप केले. या मध्ये २०० च्या आसपास कुटुंबांपर्यंत पंधरा ते वीस दिवस जाईल अशा किराणा किट पोहचवले. यासह विविध सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवुन सामाजिक क्षेत्रात काम केले आहे.
अकिब पटेल यांनी टेलिकॉम च्या व्यवसायामध्ये चांगलाच जम बसवलेला आहे. आता कळंब चे काहीतरी देणे लागते हे सामाजिक ध्येय ठेवून हा युवक व्यवसायातुन मिळालेल्या नफ्यातुन सामाजिक क्षेत्रातील कार्यामध्ये सहभाग नोंदवत आहे. याच प्रमाणे व्यवसायांमध्ये यशस्वी झालेल्या युवकांनी कळंब करीता काही तरी सकारात्मक काम करण्याचा विचार करण्याची गरज आहे.
शहरातील उपजिल्हा रुग्णालयात अनेक रुग्णांना जेवणाची तारांबळ होते. त्यामुळे येणाऱ्या काळात अन्नपूर्णा उपक्रमा अंतर्गत शहरात दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांसाठी सरकारी दवाखान्याजवळ एक अन्नछत्र उभे करायचा ध्यास आहे. निराधार व विधवा महिलांसाठी शहरात उद्योगनिर्मिती करणे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शिक्षण पुर्ण करण्यासाठी जो संघर्ष अकीब पटेल यांना करावा लागला तो दुसऱ्यांना होऊ नये म्हणुन त्यांनी गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी अल्पदरात क्लासेस सुरु करणे. हे अकीब पटेल यांचे ध्येय आहे.

Post a Comment